गुरुवार, २८ ऑगस्ट, २००८

जिलेब्याच जिलेब्या चोहीकडे....जिलेब्याच जिलेब्या चोहीकडे.... हे शिर्षक वाचून बरयाच जणांना आनंदाचं भरतं येऊन तोडाला पाणी सुटेल. पण थांबा... कारण जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. खरच सांगतो आतापर्यत जिलेबी ला
मी दुय्यम दर्जा देत इतका गांभिर्याने कधिच विचार केलेला नव्हता. पण माझ्या अवती भवती इतक्या प्रकारच्या जिलेब्या आहेतना त्यांनी मला चक्राऊन टाकलं आणि काही शोध माझ्या हातून लागले. अजून
पण मी कुठल्या जिलेबी बद्दल सांगतो आहे याची उकल नक्कीच झाली नसणार. ज्यांनी माझे मागचे लेख वाचले असतील त्यांना माहीतच आहे कि माझी कर्मभुमी दक्षिणेत वसली आहे, आणि ज्यांना नाही
माहीत त्यांना आता माहित होईल.पुण्यातल्या पुणेरी पाट्यांचा उच्छाद बघून जरा हायसं वाटलं आणि मनाशीच ठरवलं कि ह्या दक्षिणात्य पाटीवरल्या जिलब्या बद्दल जरा विस्तीर्ण लिहावं. असो.... "काला
अक्षर भैस बराबर" असं अशिक्षितांच्या बाबतीत म्हणतात पण ज्यांना दक्षिणात्य भाषा येत नसतील त्या सर्व दक्षी-अशिक्षितांच्या बाबतीत (ज्यांना कन्नड, तेलगू, तमिल आणि मल्यालम वाचता येत नाही
असे) शोध नं-१ "सारे अक्षर जिलेबी बराबर" असं आपसुकच वाटतं.
"जस जसे ऊंच जावे तसे हवा थंड होते" असं चवथीच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात कोण्या एकेकाळी सगळ्यांनी वाचलं असणार. पण मी एक नवीन शोध लावला आहे आणि तो शोध वाचल्यानंतर तुम्ही
सगळे मला नोबेल मिळावं यासाठी शिफारस करणार ही काळ्या दगडावरची रेख. तर शोध नं-२ "जस जसे दक्षिणेत खालपर्यत जावे तस तसे जिलबी चे वेटोळे वाढत जातात". बस किंवा रेल्वे ने जातांना
वाटेत येणारया पाट्यांवरून आपण कुठल्या भागातून जात आहोत हा अंदाज साधारण पणे करू शकतो. पण ही शक्कल आपण उत्तरेत वापरू शकतो तशी सर्रास दक्षिणेत वापरली तर आपला पोपट होण्याचा
योग जुळून येईल. कुणाचा ही पोपट होऊ नये यासाठी माझी काही निरीक्षणे मार्गदर्शक ठरतील असा ठाम विश्वास मला वाटतो. आपण म्हणतो कि भाषा अंगा अंगात भिनली तरंच भाषेचा प्रसार होऊ शकेल.
आता ह्या जिल्भ्याषा दक्षिणांत किती भिनल्या आहेत ते सांगतो. कुठल्याही द्रविडीयन माणसाची मिशी कधी बघितली आहे का? नाहीना. त्याच्या मिश्या कधी पिळदार तर कधी झुपकेदार. डोळ्यासमोर
चिरंजीवी, राजकुमार, कमल हसन आणि नाहीच काहीतर झुपकेदार मिशीचा विरप्पन आणा.तसं जिलब्या चार प्रकारच्या म्हणजे कानडी, तेलगू, तमिल आणि मल्याळम.सुरवातीच्या दोन बरयापैकी सारख्याच
जसे की जिलबी आणि इमरती, दोघांमध्ये फरक फक्त रंगाचा. मराठी लिखाणात जनरली आपण सरळ सरळ टोप्या घालतो. पण कानडी टोप्या थोड्या वेगळ्याच. ह्या टोप्या ऊजवी कडे वरच्या बाजुला पिळदार
दिसतात. मात्र तेलगू टोप्या ह्या टोप्या नसून बरोबरच्या चिन्हासारख्या भासतात. मराठी तीन आणि सात ची असंख्य वेळा उचलबांगडी करून हवा तसा वापर केला आहे बापड्यांचा, त्यांना इतकं गोल गोल
फिरवलय की त्यांना चक्कर येत असेन. तेलगू जिलेबीचं म्हणाल तर बरेच लहान लहान पुर्ण वर्तुळं कोंबडी जसे दाणे टिपते तसे तुम्ही डोळ्यांनी टिपाल.ह्या सगळ्या जिलब्या बघितल्यावर तर कुणी नवशिक्या
खानसाम्यानं बनविल्याकी काय असं नेहमी वाटत राहतं. तेलगू भाषेचं अजून एक वैशिष्ट म्हणजे त्यातली अक्षरं स्त्रीयाच्या कर्णफुलांच्या असंख्य डिजाईन्स सारखी.
आता जरा अतिदक्षिणे म्हणजे तमिळ आणि मल्याळम कडे वळूयात.तमिळ मध्ये काही मराठी अक्षरांशी मिळत्या जुळत्या जिलब्या आहेत. जसे भ आणि भु, नी , न , 2 अंक आणि महत्त्वाचं म्हणजे
असंख्य अनुस्वार. अनुस्वार तर इतके असतात की नाका पेक्षा मोती जड हया म्हणीची उत्पती तमिळनाडुत तर झाली नसावी असं वाटतं.आपल्या मायबोली मराठीतल्या वेलांट्यांनी तमिळ आणि मल्याळम
मध्ये कोलांट्या मारल्या आहेत पण त्या कन्नड, तेलगुत का नाही असा प्रश्न नेहमी पडतो. त्या कदाचित हवाई मार्गाने गेलया असतील अशी मी मनाची समजुत काढतो.आपण एकच अनुस्वार वापरतो पण
आत्ताच हाती आलेल्या व्रुत्तानुसार तमिळ मध्ये आठ वेगवेगळी अनुस्वारी अक्षरं आहेत.आपण मराठीतले अक्षरं लिहतांना कमीत कमी दोन तीन वेळातरी पेन/पेन्सिल/हात उचलतो.पण तमिळ मध्ये लिहतांना
जास्तीत जास्त एकच वेळा हात वर ऊचलल्याचं लक्षात येईल.उकार त्यांना ओकारी आल्यासारखे जिकडे तिकडे बरबटलेले आढळतील.तमिळच्या तुलनेत मल्याळम जरा सुटसुटित वाटते. अनुस्वार तर नावाला
पण नाही.वर वर बघितलं तर फक्त गोल,अर्धगोलच दिसतील जसे की कापलेली टायर्स किंवा ट्युब्स. म्हणून मला उलगडा झाला की मल्याळी किंवा केरळी टायर पंक्चर काढण्याचाच धंदा का करतात ते.पण
ह्या जिलब्यांसारखी अक्षरं लिहल्याचा एक फायदा म्हणजे दक्षिणातल्यांच अक्षर सुबक आणि वळणदार असते.
अजून बरीच काही जिलब्यांची वैशिष्ठ सागता येतील. तुर्तास एवढ्याच जिलेब्या तुम्हाला वाढतो अन्यथा तुमचं पोट बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता मला सांगा कि जिलबी चविष्ट झाली आहे कि
नाही..
कळावे,
ता. क. - हा लेख लिहतांना कुठल्याही भाषेचा इतिहास लक्षात घेतलेला नाही. फक्त थोडी गंमत करावी हा उद्देश.

बुधवार, १३ ऑगस्ट, २००८

बघा जरा चौकट मोडुन....

हल्ली आपला जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण किती बदलला आहे नाही का? किती रुष्ट झालो आहोत असं नाही का वाटत कुणालाच? बरयाच जणांना वाटते की आपण राजे झालो आहोत, पण सगळे कसे चौकट च्या राज्यासारखे वागतात असंच सारखं वाटत राहतं.अगदी काल परवाच घडलेला एक गमतीदार पण विचार करायला लावणारा किस्सा..
माझे काही मित्र त्यांच्या मित्राच्या विवाहात उपस्थित राहण्यासाठी (नव्हे वीकएंड आऊटिंगसाठी) बस ने जाणार होते.आता ते जाणाऱ म्हणजे मी त्यांना सोडायला जाणं आलंच.इंग्रजीत यालाच सी ऑफ की काय म्हणतात. (मुळ मुद्दा खडकी ला जातोय.) असो.. तर आम्ही सगळे बस थांब्यावर बसची वाट बघत,वेळ घालवत बसलो होतो. वीकएंड असल्यामुळे मुळगावाकडे(अहो नेटिव्ह) जाणारी, लग्न सराई असल्यामुळे लग्ननाला जाणारी,रातराणी ने जाणारी अशी भरपुर मेल्स, फिमेल्स (हल्ली आयटी वाल्यांना स्त्री पुरुष म्हटलं तर मळंमळायला होतं) वेळ साधारण रात्रीचे ११. हल्ली ११ म्हणजे रात्र म्हणने जरा धाडस होऊन मला राष्ट्रपती शौर्यपदकाची शिफारस तर नक्कीच मिळेल, आणि त्याहून शुक्रवार किंवा शनीवार असला तर सांगायची गरजच नाही.तर आमच्यातले काही बसथाब्याच्या(खाजगी बसवहातुक) बाकावर,काही खुर्चीत आणि आमच्यातलंच एक पामर ताटकळत ऊभं होतं, असा सगळा सीन (सीन निट लक्षात असू द्या) असतांना साधारण आमच्याच वयाचा एक तरुण आला. (येथे वाचकांचा गैरसमज झाला असता की लिहणारा म्हणजे मी वयस्क तर नाही ना! असा अंदाज बांधू शकतात म्हणून आमच्याच वयाचा तरुण).
तो बिचारापण आमच्यासारखा संगणकाच्या कळींशी खेळून दमला असणार हे त्याचा चेहरा आणि त्याची पाठीवरची बॅग सांगत होती.(आता प्रतिसादामध्ये मला कुणीतरी विचारणार बॅगवरून कसे? समजा बॅग अगदी बरोबर पाठीवर असेल तर त्या ई तरुणाला काम नाही, जर बॅग अगदी बरोबर पाठ आणि कंबरेच्या मध्ये असेल तर निम्मा वेळ ई-मेल्स आणि निम्मा वेळ कामात जातो, आणि शेवटचा ग्रुप म्हणजे ज्यांची बॅग अगदी बरोबर मागच्या खिश्याच्याही खाली असेन तर समजावं काम भरपुर) आता अतीश्रमामुळे सहाजिकच त्याला बसायचे होते(बुड टेकवायचे ! म्हणा हवंतर) तो बसायला जागा शोधता शोधता आमच्या पर्यत आला. मी बाकावर बसलो होतो, माझ्या डाव्या बाजुला(हल्ली डावे फार आक्रमक झाले आहेत) माझा मित्र आणि उजव्या बाजूला बसायला थोडी जागा होती, पण पुढे झाड असल्यामुळे जरा अंधार होता. मित्रहो इथून जरा गंमत आहे.तो मला म्हणाला जरा जागा देणार का बसायला.आता मी जर डाव्याबाजुला सरकलो असतो तर मी आडोश्याला अंधारात माझी इच्छा नसतांना झाकलो गेलो असतो.(ग्रहण बिहण काहीतरी असतं असं वाचलय साळत अगदी तसं). मी म्हणालो "कारं बाबा..? तु बस की तिकडं" त्याने त्याचे डोळयांची बाहुल्या आणि चेहरा यात नव्वद अंशाचा कोन करून बघितलं. अन काय सांगता घाबुरलू ना मी..(हे मी चक्क शुद्ध मराठीत बोललु) पन त्याला मी म्हन्लं "बाबा माझ्या वरचा फोकस जाईन की रं! (इथे फक्त फ़िमेल्सचा) इथं एवढया फिमेल्स आणि मला यंदा कर्तव्य बी हाय.." हा माझा युक्तिवाद त्याला कळला/समजला तसा त्याचा चेहरा आईशप्पथ काय खुल्ला सांगु.. सगळा शिक्वेन्स लक्षात ठेवा बरंका! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.(ओम शांती ओम)
जागा तीच, सगळा सेट तोच पण एक सोडलं तर पात्र तीच आणि माझ्या मित्रांच्या द्रुष्टिने जरा विचित्र पात्र म्हणजे.. मीच की. तर ते नवीन पात्र म्हणाल तर साधारण काका प्लस वय, आमच्या समोर खुर्चीत बसलेले(कोल्हपुर, सांगली चे असावेत , त्यांची मिशी सांगत होती) .त्याना जरा चलत दुरध्वनी(मोबाईल) वरती कॉल आला असेन. तर त्यांनी आपली खुर्ची सोडली.(जशी काही दिवसांत मनमोहन सिंग यांना सोडावी लागणार तशी).तेवढ्यात मी आमच्यातल्या ताटकळत ऊभं असलेल्या पामराला काकांच्या खुर्चीत बसवलं.(पामराची इतकी ताकतचं नाही की तो स्वतः काकांच्या खुर्चीत बसेल).आमचं पामर भित भितच बसलेलं. आणि काय सांगु तुम्हाला ते मिशीवाले काका आले ना.. बोंबला! ते आले आणि म्हणतात कसे " ही माझी जागा आहे! मी बसलो होतो ह्या खुर्चीत ". आता.. झाली का पंचाइत पामराची. मी आपला तयार नेहमी सारखा, पोजिशन घेतली. अन म्हणालो "रुमाल बिमाल टाकलेला आम्हाला नाही दिसला! अन तुम्ही म्हणताय तुमची जागा" (हे रुमाल प्रकरण समजायला बस, एसटी ने प्रवास करावा लागतो) त्यांना उमगलं ह्या कार्ट्यानं आपली विकेट घेतली.तुम्हाला सांगू इतके गोड हसले ना ते.(रात्र नसती तर गालावरची खळी पण दिसली असती) तितक्यात म्हणजे काका नसतांना आमचं पामर पुटपुटलं "अरे काय खेचतो आहेस उगाच सगळ्यांची!" तुम्हीच सांगा हे खेचणं आहे का? की थोडी गंमत.
आपण दिवसातून किती तरी लोकांना भेटत/बघत असु. कधी बोलला आहात का त्यांच्याशी, कधी जाणलंय बस मधल्या तुमच्या सह-प्रवाश्याला? कधी आणलंय हसू तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या चेहरया वर? नाही ना? प्रयत्न करा हो जरा! जमेन आपल्या सगळयांना,बघा कशी दाद मिळते ते. वरील दोन व्यक्ती, दोन विचार, दोन पिढ्या, पण दोघे सुद्धा जीवनाच्या रहाट गाड्यात गुर्फटून गेले आहेत असं नाही का वाटत?. देऊ शकाल दोन क्षण चौकटी बाहेरचे? बघा जमलं तर सोडा आपली चौकटच्या राज्याची चौकट..

बुधवार, ६ ऑगस्ट, २००८

चाये! चायेऽऽ चाएयेऽऽ!!!!

चहा.. का पितो आपण? यापेक्षा जे पीत नसतील त्यांना विचारलं पाहिजे की ते का पीत नाही? चहा पिणं यासारखं दुसरं सुख नाही हो. बरेच चहावेडे असतात त्यातलाच मी एक. मला जर कळलं की अमुक अश्या ठिकाणी फक्कड चहा मिळतो की माझा गुगलींग चा ऑटो प्रोग्रॅम रन(सुरू) होते. फक्कड चहा काय असतो असं विचाराल तर जो चहा जिभेवर बऱ्याच वेळापर्यंत तरळत राहील असा, ज्याने किक बसेल असा(किक बसणे ह्या शब्दाचा अर्थ कळायची कमीत कमी पात्रता म्हणजे तुमचा तंबाखू खाणाऱ्या बरोबरचा सहवास) चहा जर मला मनोगत वर लिहायला उद्युक्त करतोय म्हटल्यावर मी किती ठार चहावेडा असेन याची आतापर्यंत तुम्हाला कल्पना आलीच असेन. ("कल्पना" ही कुणी व्यक्ती नाही! वाचकांना जागृत करणं हा उद्देश नाहीतर काही ना त्यांची *** आठवेल. "जे मनी वसे ते कुठेही दिसे") आजपर्यंत मी अनेक ठिकाणचे चहा पिले आहेत अनेक चहावाले बघितले आहेत, अनेक चहावाल्यांना चहा बनवताना बघितला आहे, त्याच्या चहाची चव पण अनुभवली आहे. त्यातले काही चहा तुमच्या चहापानासाठी....

मला सगळ्यात आधी आठवतो तो अहमदनगर शहराच्या दिल्ली गेट चा "गौत्या". (यापूर्वी आम्ही आमच्या मायभूमीत आमच्या माउलीने बनविलेलाच चहा सर्वस्व मानत होतो). आई शप्पथ सांगतो या"गौत्या"ला जर कोणी त्याच्या खऱ्या "गौतम" नावाने ओळखत असेन तर मी नसलेली अर्धी मिशी उडवीन. मी पाचेक वर्ष स्वतःला "नगरी" म्हणवून घेतलं असल्यामुळे नगरात चहा-कारण(नगरातल्या मुरब्बी राजकारण्याने राजकारण करावं तसं) करावंच लागलं. तर ह्या गौत्याचा स्टोव्ह सकाळी सहा ते रात्री दहा असा अखंड हरिनाम करत असायचा आणि अजूनही करत असेन यात तीळमात्र शंका नाही. परंतु त्या स्टोव्ह मध्ये हवा मारणारे मात्र दोन एक "गौतम" आणि त्याचे तीर्थरूप "अण्णा". मी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्याने कुणीही न घातलेले असे सगळे नियम पाळत असे. उषःचर (सकाळी लवकर उठणे आणि अभ्यास वगैरे करणे) असल्यामुळे मला दोन्ही भेटत. अण्णा माझ्यासारख्याला सकाळी तीर्थरूप आणि दुपारी निव्वळ अण्णा "असायचा" कारण दुपारी त्यांनी वेगळंच तीर्थ प्राशन केलेलं असायचं. कितीही तीर्थप्राशन केलेलं असलं तरी कधी चहात साखर जास्त वा कमी झाल्याच आठवत नाही. आता जरा गौत्या बद्दल बोलतो. "गौत्या" आणि "गोल गरगरीत माठ" यात जर काही वेगळं असेल तर दोघांचा रंग आणि उंची. त्याच्या उदराने सामान्य माणसाच्या उदराच्या व्याख्येचा वि**भंग केलेला. इतका की जर तो त्याच्या चहाच्या गाडीवरल्या स्टोव्ह च्या जरा जवळ जरी गेला तरी त्याचा माठ(उदर) भाजायचा. हे कुणीतरी बघितलं आणि त्याला विचारलं " का रं? काय झालं" (हे नगरी ठसक्यात म्हणून बघा! ) तर असला गोड हसायचा सांगू. अण्णा असो किंवा गौत्या असो चहा च्या चवीत कधीच फरक जाणवला नाही. नगरच दिल्लीगेट म्हणजे पुण्यातले फर्ग्युसन, एम आयटी, गरवारे च्या आजूबाजूसारखंच, आनंदी आनंद घडे विद्यार्थीच विद्यार्थी चोहीकडे. अण्णा आणि गौत्या ह्या दोन हिऱ्यांचा अजून एक पैलू "दयाळू". जर त्यांना कळलं की एखाद्याचे पैसे संपले आहेत तर तो आठवडाभर पैसे परत मागणार नाही. त्यांनी एक रुपयाचा चहा सव्वा रुपया केला होता तरी मी किती तरी महीने रुपयाच टेकवला होता पण कधी एक शब्द देखील काढला नाही.

माझ्या आजवरच्या कारकीर्दीतला दुसरा चहात्कार म्हणजे धुळ्याच्या पारोळा की आग्रा रस्त्यावरचा "गोपाल टी हाउस". एक आठ दहा वर्षांपूर्वी चार रुपयाचा चहा पिणं म्हणजे सर्वसामान्यांसाठी जरा दिवास्वप्नच असे आणि माझ्यासारख्यासाठी चंगळ! पण माझ्यासारखाच चहावेडा असलेला माझा धुळ्याचा चुलत भाऊ. त्यानेच हा चहावाला शोधून काढला. त्याने तसं नसत केलं तर तुम्ही एका चविष्ट चहाला मुकला असता. बहुदा "व्हॅल्यू फॉर मनी" हे त्याचं ब्रीदच असावं. ( पुण्यात फक्त ब्रीदच असत मुळात तुम्हाला शेंडी लावलेली असते हे कळतं पण वळत नाही) मुळातच त्याचा कप आणि बशी मोठी, तरीसुद्धा कपाच्या वरच्या कडे पर्यंत काठोकाठ, बशीत पण जवळपास पाऊण कप भरेल इतका चहा. चहाचा रंग गव्हाळ, चव तर काय अप्रतिम. प्यायल्यानंतर साधारण एक तास तरी ती चव रेंगाळत असायची. (महाराष्ट्रातल्या एका शहरात अमृत-त्तुल्य नावाने चक्क गरम पाण्याचा डोस पाजला जातो. शहराच्या नावाचा उल्लेख टाळतो कारण "झाकली मूठ सव्वा लाखाची" का काय ते) मला यापेक्षा अजूनतरी सरस चहा कुठेच मिळाला नाही. पुण्यातले "अमृत-तुल्य छाप" चहावाले त्यांचा निम्मा वेळ भांडे पुसण्यातच खर्च करतात आणि परत वर तोंड करून सांगणार "हाईजीन". ह्यातला काही वेळ जर चहा बनविण्यासाठी कारणी लावला तर माझा लेख सत्कारणी लागला असं समजेल. कधी धुळ्याला जायची वेळ आली तर मी नक्कीच जातो आणि चहा हापसून येतो. (हापसून मुद्दामच कारण एका चहाच्या कपाने आपलं काय भागत नाही बुवा).

मी दक्षिण भारतात जाऊन येऊन असतो. दक्षिण भारतीयांची चहाची कन्सेप्टच मुळात वेगळी. तिकडे चाय असं तोंडाचा चंबू जरी करून जरी दाखवला तरी कुणाला कळणार नाही. तिकडे टियाऽऽऽ असंच म्हणावं. टियातल्या "या" ला जितकं लांबवता येईल तितक्या लवकर तुमच्या भावना चहावाल्याला पोहचतील. चैन्नई ला जर गेलात तर त्यांचा चहा बनविण्याचा कोड(पद्धत: आयटी प्रतिशब्द) चुकीचा आहे असं वाटत राहील. एक चहाची स्टील किंवा ऍल्यूमिनियम ची तोटी असलेली किटली अखंड पणे चटके सोसत असते. बहुदा आपल्याकडे "मनपा च्या नळाला" लावतो तशी पिशवी वजा चाळणी ह्या किटलीत तिन्ही त्रिकाळ उकळत्या पाण्यात पोहत असते. पिशवी तीच पण चहा(भुकटी) मात्र एक दोन तासात बदलत असते. आता ऍक्चीऊली साऊथ इंडियन चहा कसा बनवतात ते बघू. एका "ग्लास"च्या पेल्या मध्ये साधारण एक दीड चमच्या साखर आणि १/३ दूध घालून ठेवतात. मघाची ती मनपा छाप पिशवी त्या किटलीतून बाहेर येते ती सरळ त्या "ग्लास"च्या पेल्या च्या डोक्यावर. मग त्या पिशवीतल्या चहातला अर्क भुकटीने शोषलेल्या पाण्याबरोबर पेल्यातल्या दुधाबरोबर हुज्जत घालतो(जसे बिहारी भैय्ये आपल्याशी घालतात तशी). आता जरा कुठे चहा ने बाळसं धरलं आहे असं रंगावरून समजते. इतके सोपस्कार झाल्यानंतर तो चहावाला तंबी(महाराष्ट्राचा : अण्णा, ऊ. प्रदेश चा: भैय्या, साऊथचा : तंबी) एका हातात रिकामा स्टीलचा वा तत्सम पेला आणि "वर" दुसऱ्या हातात बाळसं धरलेला चहा चा पेला, दोन्ही मध्ये साधारण दोन फूट अंतर. तंबी तो चहा रिकाम्या पेल्यात असा काय ओततो ना, हे बघून साऊथ आफ्रिकेचा जॉंंटी रोडस पण थक्क होईल. हा प्रकार मोजून चार पाच वेळेस होतो. याला फार स्किल पाहिजे: सामान्य माणसाने असं काही करू नये हा वैधानिक इशारा. (पोळल्यास संपादक आणि लेखक जबाबदार नाहीत) सगळ्यात शेवटी मस्त फेसाळत्या दुधातून एक चमचा मलईचं टॉपिंग. कारण त्यांना माहीत असावं की त्यांचा चहा फक्कड ची मर्यादा ओलांडू शकत नाही. पण चैन्नई ला अपवाद तो हैदराबाद च्या चारमिनार जवळच्या "निमराह" बेकरीतल्या चहाचा. मी हैदराबाद मध्ये असताना फक्त चहा पिण्यासाठी चारमिनार ला जात असे. माझी कचेरी( ऑफिस: मराठी प्रतिशब्द) ते चारमिनार अदमासे ४० किलोमीटर. ४० किलोमीटरवरून मी चहा प्यायला जात असेन तर तो चहा किती अप्रतिम असेन याची "कल्पना"( जागते रहो! ) आलीच असेन. ह्या चहाची अजून एक "जपानी दिवानी" (कुणाला रणधीर कपूर+ जया भादुरीं चा जवानी दिवानी चित्रपट आठवेल) ती म्हणजे माझ्या कचेरीतली सहकारणी. ती तर इतकी वेडावली होती की तिने त्या निमराह बेकरी च्या मालकांना ते कुठला चहा( आसाम की दार्जिलिंग)किती प्रमाणात वापरतात इतपत माहिती काढली होती. तिला जर तेलुगू येत असतं तर तिने अख्खा रेसिपीचा कोड जपानी भाषेत कॉपी पेस्ट केला असता.

आता सगळ्यात शेवटचा. "चाय ये! चायये! गरम चाये.... " अशी आरोळी बऱ्याच जणांनी रेल्वेप्रवासात कधी तरी अनुभवली असणार, भारतात कुठेही ही गेलात तरी. सकाळी सकाळी तऱ ह्या रेल्वेतल्या चहावाल्यांना अगदी ऊत आलेला असतो. त्यांचा ऊत आणि उत्साह ह्यामुळे साहजिकच चहा प्यायची इच्छा कुणाला नाही होणार. त्यांचा उत्साह आणि चहाची चव अगदी इनव्हर्रसली प्रपोर्शन मध्ये असतात. त्यामुळे चहाची तलफ काही केल्या जात नाही. रेल्वेत ला चहा कसा बनवितात हे मला अजून एक्सप्लोर नाही करता आलं याची नेहमी खंत वाटते. आज काल म्हणे लालू प्रसादांनी रेल्वे तक्रार चा ब्लॉग सुरू केला आहे, आणि ते स्वतः उत्तरे देतात म्हणे. आता लवकरच मी माझं चहाचं गाऱ्हाणं त्यांच्याकडे मांडतो आणि तुम्हाला कळवतो आणि इतकं सगळं वाचल्यावर तुम्ही मला चहासाठी नक्कीच बोलवाल आशी माफक इच्छा ठेवतो.

इति चहापुराणं संपुर्णम....