बुधवार, ६ ऑगस्ट, २००८

चाये! चायेऽऽ चाएयेऽऽ!!!!

चहा.. का पितो आपण? यापेक्षा जे पीत नसतील त्यांना विचारलं पाहिजे की ते का पीत नाही? चहा पिणं यासारखं दुसरं सुख नाही हो. बरेच चहावेडे असतात त्यातलाच मी एक. मला जर कळलं की अमुक अश्या ठिकाणी फक्कड चहा मिळतो की माझा गुगलींग चा ऑटो प्रोग्रॅम रन(सुरू) होते. फक्कड चहा काय असतो असं विचाराल तर जो चहा जिभेवर बऱ्याच वेळापर्यंत तरळत राहील असा, ज्याने किक बसेल असा(किक बसणे ह्या शब्दाचा अर्थ कळायची कमीत कमी पात्रता म्हणजे तुमचा तंबाखू खाणाऱ्या बरोबरचा सहवास) चहा जर मला मनोगत वर लिहायला उद्युक्त करतोय म्हटल्यावर मी किती ठार चहावेडा असेन याची आतापर्यंत तुम्हाला कल्पना आलीच असेन. ("कल्पना" ही कुणी व्यक्ती नाही! वाचकांना जागृत करणं हा उद्देश नाहीतर काही ना त्यांची *** आठवेल. "जे मनी वसे ते कुठेही दिसे") आजपर्यंत मी अनेक ठिकाणचे चहा पिले आहेत अनेक चहावाले बघितले आहेत, अनेक चहावाल्यांना चहा बनवताना बघितला आहे, त्याच्या चहाची चव पण अनुभवली आहे. त्यातले काही चहा तुमच्या चहापानासाठी....

मला सगळ्यात आधी आठवतो तो अहमदनगर शहराच्या दिल्ली गेट चा "गौत्या". (यापूर्वी आम्ही आमच्या मायभूमीत आमच्या माउलीने बनविलेलाच चहा सर्वस्व मानत होतो). आई शप्पथ सांगतो या"गौत्या"ला जर कोणी त्याच्या खऱ्या "गौतम" नावाने ओळखत असेन तर मी नसलेली अर्धी मिशी उडवीन. मी पाचेक वर्ष स्वतःला "नगरी" म्हणवून घेतलं असल्यामुळे नगरात चहा-कारण(नगरातल्या मुरब्बी राजकारण्याने राजकारण करावं तसं) करावंच लागलं. तर ह्या गौत्याचा स्टोव्ह सकाळी सहा ते रात्री दहा असा अखंड हरिनाम करत असायचा आणि अजूनही करत असेन यात तीळमात्र शंका नाही. परंतु त्या स्टोव्ह मध्ये हवा मारणारे मात्र दोन एक "गौतम" आणि त्याचे तीर्थरूप "अण्णा". मी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्याने कुणीही न घातलेले असे सगळे नियम पाळत असे. उषःचर (सकाळी लवकर उठणे आणि अभ्यास वगैरे करणे) असल्यामुळे मला दोन्ही भेटत. अण्णा माझ्यासारख्याला सकाळी तीर्थरूप आणि दुपारी निव्वळ अण्णा "असायचा" कारण दुपारी त्यांनी वेगळंच तीर्थ प्राशन केलेलं असायचं. कितीही तीर्थप्राशन केलेलं असलं तरी कधी चहात साखर जास्त वा कमी झाल्याच आठवत नाही. आता जरा गौत्या बद्दल बोलतो. "गौत्या" आणि "गोल गरगरीत माठ" यात जर काही वेगळं असेल तर दोघांचा रंग आणि उंची. त्याच्या उदराने सामान्य माणसाच्या उदराच्या व्याख्येचा वि**भंग केलेला. इतका की जर तो त्याच्या चहाच्या गाडीवरल्या स्टोव्ह च्या जरा जवळ जरी गेला तरी त्याचा माठ(उदर) भाजायचा. हे कुणीतरी बघितलं आणि त्याला विचारलं " का रं? काय झालं" (हे नगरी ठसक्यात म्हणून बघा! ) तर असला गोड हसायचा सांगू. अण्णा असो किंवा गौत्या असो चहा च्या चवीत कधीच फरक जाणवला नाही. नगरच दिल्लीगेट म्हणजे पुण्यातले फर्ग्युसन, एम आयटी, गरवारे च्या आजूबाजूसारखंच, आनंदी आनंद घडे विद्यार्थीच विद्यार्थी चोहीकडे. अण्णा आणि गौत्या ह्या दोन हिऱ्यांचा अजून एक पैलू "दयाळू". जर त्यांना कळलं की एखाद्याचे पैसे संपले आहेत तर तो आठवडाभर पैसे परत मागणार नाही. त्यांनी एक रुपयाचा चहा सव्वा रुपया केला होता तरी मी किती तरी महीने रुपयाच टेकवला होता पण कधी एक शब्द देखील काढला नाही.

माझ्या आजवरच्या कारकीर्दीतला दुसरा चहात्कार म्हणजे धुळ्याच्या पारोळा की आग्रा रस्त्यावरचा "गोपाल टी हाउस". एक आठ दहा वर्षांपूर्वी चार रुपयाचा चहा पिणं म्हणजे सर्वसामान्यांसाठी जरा दिवास्वप्नच असे आणि माझ्यासारख्यासाठी चंगळ! पण माझ्यासारखाच चहावेडा असलेला माझा धुळ्याचा चुलत भाऊ. त्यानेच हा चहावाला शोधून काढला. त्याने तसं नसत केलं तर तुम्ही एका चविष्ट चहाला मुकला असता. बहुदा "व्हॅल्यू फॉर मनी" हे त्याचं ब्रीदच असावं. ( पुण्यात फक्त ब्रीदच असत मुळात तुम्हाला शेंडी लावलेली असते हे कळतं पण वळत नाही) मुळातच त्याचा कप आणि बशी मोठी, तरीसुद्धा कपाच्या वरच्या कडे पर्यंत काठोकाठ, बशीत पण जवळपास पाऊण कप भरेल इतका चहा. चहाचा रंग गव्हाळ, चव तर काय अप्रतिम. प्यायल्यानंतर साधारण एक तास तरी ती चव रेंगाळत असायची. (महाराष्ट्रातल्या एका शहरात अमृत-त्तुल्य नावाने चक्क गरम पाण्याचा डोस पाजला जातो. शहराच्या नावाचा उल्लेख टाळतो कारण "झाकली मूठ सव्वा लाखाची" का काय ते) मला यापेक्षा अजूनतरी सरस चहा कुठेच मिळाला नाही. पुण्यातले "अमृत-तुल्य छाप" चहावाले त्यांचा निम्मा वेळ भांडे पुसण्यातच खर्च करतात आणि परत वर तोंड करून सांगणार "हाईजीन". ह्यातला काही वेळ जर चहा बनविण्यासाठी कारणी लावला तर माझा लेख सत्कारणी लागला असं समजेल. कधी धुळ्याला जायची वेळ आली तर मी नक्कीच जातो आणि चहा हापसून येतो. (हापसून मुद्दामच कारण एका चहाच्या कपाने आपलं काय भागत नाही बुवा).

मी दक्षिण भारतात जाऊन येऊन असतो. दक्षिण भारतीयांची चहाची कन्सेप्टच मुळात वेगळी. तिकडे चाय असं तोंडाचा चंबू जरी करून जरी दाखवला तरी कुणाला कळणार नाही. तिकडे टियाऽऽऽ असंच म्हणावं. टियातल्या "या" ला जितकं लांबवता येईल तितक्या लवकर तुमच्या भावना चहावाल्याला पोहचतील. चैन्नई ला जर गेलात तर त्यांचा चहा बनविण्याचा कोड(पद्धत: आयटी प्रतिशब्द) चुकीचा आहे असं वाटत राहील. एक चहाची स्टील किंवा ऍल्यूमिनियम ची तोटी असलेली किटली अखंड पणे चटके सोसत असते. बहुदा आपल्याकडे "मनपा च्या नळाला" लावतो तशी पिशवी वजा चाळणी ह्या किटलीत तिन्ही त्रिकाळ उकळत्या पाण्यात पोहत असते. पिशवी तीच पण चहा(भुकटी) मात्र एक दोन तासात बदलत असते. आता ऍक्चीऊली साऊथ इंडियन चहा कसा बनवतात ते बघू. एका "ग्लास"च्या पेल्या मध्ये साधारण एक दीड चमच्या साखर आणि १/३ दूध घालून ठेवतात. मघाची ती मनपा छाप पिशवी त्या किटलीतून बाहेर येते ती सरळ त्या "ग्लास"च्या पेल्या च्या डोक्यावर. मग त्या पिशवीतल्या चहातला अर्क भुकटीने शोषलेल्या पाण्याबरोबर पेल्यातल्या दुधाबरोबर हुज्जत घालतो(जसे बिहारी भैय्ये आपल्याशी घालतात तशी). आता जरा कुठे चहा ने बाळसं धरलं आहे असं रंगावरून समजते. इतके सोपस्कार झाल्यानंतर तो चहावाला तंबी(महाराष्ट्राचा : अण्णा, ऊ. प्रदेश चा: भैय्या, साऊथचा : तंबी) एका हातात रिकामा स्टीलचा वा तत्सम पेला आणि "वर" दुसऱ्या हातात बाळसं धरलेला चहा चा पेला, दोन्ही मध्ये साधारण दोन फूट अंतर. तंबी तो चहा रिकाम्या पेल्यात असा काय ओततो ना, हे बघून साऊथ आफ्रिकेचा जॉंंटी रोडस पण थक्क होईल. हा प्रकार मोजून चार पाच वेळेस होतो. याला फार स्किल पाहिजे: सामान्य माणसाने असं काही करू नये हा वैधानिक इशारा. (पोळल्यास संपादक आणि लेखक जबाबदार नाहीत) सगळ्यात शेवटी मस्त फेसाळत्या दुधातून एक चमचा मलईचं टॉपिंग. कारण त्यांना माहीत असावं की त्यांचा चहा फक्कड ची मर्यादा ओलांडू शकत नाही. पण चैन्नई ला अपवाद तो हैदराबाद च्या चारमिनार जवळच्या "निमराह" बेकरीतल्या चहाचा. मी हैदराबाद मध्ये असताना फक्त चहा पिण्यासाठी चारमिनार ला जात असे. माझी कचेरी( ऑफिस: मराठी प्रतिशब्द) ते चारमिनार अदमासे ४० किलोमीटर. ४० किलोमीटरवरून मी चहा प्यायला जात असेन तर तो चहा किती अप्रतिम असेन याची "कल्पना"( जागते रहो! ) आलीच असेन. ह्या चहाची अजून एक "जपानी दिवानी" (कुणाला रणधीर कपूर+ जया भादुरीं चा जवानी दिवानी चित्रपट आठवेल) ती म्हणजे माझ्या कचेरीतली सहकारणी. ती तर इतकी वेडावली होती की तिने त्या निमराह बेकरी च्या मालकांना ते कुठला चहा( आसाम की दार्जिलिंग)किती प्रमाणात वापरतात इतपत माहिती काढली होती. तिला जर तेलुगू येत असतं तर तिने अख्खा रेसिपीचा कोड जपानी भाषेत कॉपी पेस्ट केला असता.

आता सगळ्यात शेवटचा. "चाय ये! चायये! गरम चाये.... " अशी आरोळी बऱ्याच जणांनी रेल्वेप्रवासात कधी तरी अनुभवली असणार, भारतात कुठेही ही गेलात तरी. सकाळी सकाळी तऱ ह्या रेल्वेतल्या चहावाल्यांना अगदी ऊत आलेला असतो. त्यांचा ऊत आणि उत्साह ह्यामुळे साहजिकच चहा प्यायची इच्छा कुणाला नाही होणार. त्यांचा उत्साह आणि चहाची चव अगदी इनव्हर्रसली प्रपोर्शन मध्ये असतात. त्यामुळे चहाची तलफ काही केल्या जात नाही. रेल्वेत ला चहा कसा बनवितात हे मला अजून एक्सप्लोर नाही करता आलं याची नेहमी खंत वाटते. आज काल म्हणे लालू प्रसादांनी रेल्वे तक्रार चा ब्लॉग सुरू केला आहे, आणि ते स्वतः उत्तरे देतात म्हणे. आता लवकरच मी माझं चहाचं गाऱ्हाणं त्यांच्याकडे मांडतो आणि तुम्हाला कळवतो आणि इतकं सगळं वाचल्यावर तुम्ही मला चहासाठी नक्कीच बोलवाल आशी माफक इच्छा ठेवतो.

इति चहापुराणं संपुर्णम....

३ टिप्पण्या:

om म्हणाले...

Friend,

story is good but in that there is so much comment(which u r type in bracket). bcoz of that comments its create distebance in readers mind. Take my example i want to read this full story but i am getting irrited bcoz of that comments which r in every line. Too many comments r breaking link of reader.He can't enjoy the story.

Just as a reader I want to tell u that if u had reduced comment your story would have been batter.



Omkar

Unknown म्हणाले...

Nice Nitin....I think u have no work....Pl tell to create this kind of file....website...i am intersted to join it.....bye...have a nice day.....Rahul Kadus

Zillion Technology Services Team Blog म्हणाले...

Hi Nitin,

Nice work.

Keep it up.